विधानसभा प्रश्नोत्तरे

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १० : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य नमिता मुंदडा, श्रीजया चव्हाण यांनी विधानससभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १५० एमबीबीएस व ८७ पीजी विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार शैक्षणिक व रुग्णसेवा सुविधा असून  क्षमतेच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्याने तातडीने सुधारणा आवश्यक आहे. त्यासाठी  २८० खाटांची दुरुस्ती, २५० क्षमतेच्या वसतिगृहाचे बांधकाम, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, डांबरी रस्त्यांचे बांधकाम,जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचे बीएससी नर्सिंगमध्ये रुपांतर करणे यासाठी  सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांसाठी १८१ कोटी रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

याचबरोबर रिक्त प्राध्यापक पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयात कॅन्सर उपचारासाठी एल-१,एल-२, एल-३ सुविधांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी नवीन धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. तसेच, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कार्डिओलॉजी यांसारख्या सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘एनपीएनजीसी’ योजनेंतर्गत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या सर्व आरोग्य सुविधा या आर्थिक वर्षातच कार्यान्वित करण्यात येतील, असे आश्वासनही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री  मुश्रीफ यांनी सभागृहात दिले.

0000

कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालयातील आरोग्य सुविधांसंदर्भात उच्चस्तरीय समिती गठित करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १० : वर्धा जिल्ह्यातील कस्तुरबा हेल्थ सोसायटीद्वारे संचालित कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य सुविधा आणि व्यवस्थापन संदर्भातील  तक्रारीबाबत उच्चस्तरीय समिती गठित करून स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला जाईल, असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य राजेश बकाने यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुश्रीफ बोलत होते.

कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालय  गोरगरीब रुग्णांसाठी माफक दरात सेवा पुरवते. हे रुग्णालय ५० टक्के  केंद्र सरकार आणि २५ टक्के राज्य सरकारच्या अनुदानावर चालवले जाते. मात्र वैद्यकीय उपकरणांची कमतरता, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसणे, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि व्यवस्थापनाकडून होणारे दुर्लक्ष यासंदर्भातील प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करून या समितीची आणि  स्थानिक लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन याबाबतचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  सांगितले.

या चर्चेदरम्यान लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असेही श्री. मुश्रीफ यांनी  सांगितले.

विधानसभा सदस्य समीर कुणावार, सुमित वानखेडे, अभिमन्यू पवार, अमित देशमुख  यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

00000

रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू; मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 10 : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य राजकुमार बडोले, धर्मरावबाबा आत्राम, नाना पटोले यांनी प्रश्न उत्तरेच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.

राज्यात ‘कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ हे अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले जाते. याच सर्वेक्षण दरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील कुमारी खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते.  दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानुसार टिशू अ‍ॅस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी व रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच  या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील देण्यात आले आहे. आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.

000000

काशीबाई थोरात/व.स.सं