विधानपरिषद प्रश्नोत्तरे

उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे पारसिक हिलवर वृक्षतोडीबाबत पाहणी करण्यात आली आहे. पारसिक हिल ठिकाणी उच्च विद्युत वाहिनी पॉवर कॉरिडॉर असून वृक्षामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी फक्त झुडुपाची छाटणी केली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे का, याबाबत चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानपरिषद सदस्य भाई जगताप, शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मंत्री श्री.सामंत यांनी उत्तर दिले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, आजबाजूच्या परिसरात बांधकाम चालू करण्यासाठी अनधिकृत जंगलतोड होत असेल, तर याची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल.

000

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १० : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क कुणालाही डावलू दिला जाणार नाही. जर एखादा विकासक मराठी माणसाला घरे विक्रीसाठी नाकारत असेल, अशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि मराठी माणसाला घरे खरेदीसाठी प्राधान्य मिळावे, यासाठी लवकरच धोरण निश्चित केले जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

नवीन इमारतीत मराठी माणसाला मुंबईत घरे खरेदीसाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मंत्री श्री.देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश राठोड, प्रसाद लाड, ॲड.अनिल परब, सचिन अहिर, हेमंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, विविध शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एससी, एसटी, एनटी, व डीटी, माजी सैनिक, कलाकार, राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी, अंध व दिव्यांग यांच्यासाठी विशिष्ट टक्केवारीने आरक्षण आहे.

शेवटी, मराठी भाषिक नागरिकांना घर खरेदी करताना जर कुणी बांधकाम व्यावसायिक भेदभाव करत असेल, तर राज्य शासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

000

छत्रपती संभाजीनगर – पैठण महामार्गाच्या कामाला गती; अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, दि. १० : छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा ४२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गातील ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सदस्य विक्रम काळे यांनीही उपप्रश्न विचारले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, या रस्त्याचे काम सलग न झाल्यामुळे  अपघातांचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) रस्त्याखालील पाईपलाईनचे काम हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळे काही अडथळे निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनचे काम पूर्ण होईल.

सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर बोर्ड आदी लवकरच बसवण्याच्या सूचना ‘एनएचआय’ला देण्यात येतील. तसेच छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.”

रस्त्यासाठी ७९७ झाडे वाचवण्यात यश आले आहे, रस्त्याची अलाइनमेंट थोडी बदलून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आला आहे. एकूण २०० कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम असून, भू-संपादनाची प्रक्रिया देखील युद्धपातळीवर सुरु असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.

दौलताबाद टी पॉइंटच्या निविदांबाबत श्री. भोसले म्हणाले, ५ मार्च २०२४ रोजी निविदा सूचना काढण्यात आली होती. उच्च न्यायालयात यासंदर्भातील निकाल लागून निविदा स्वीकृतीची प्रक्रिया २३ जून २०२५ रोजी पूर्ण झाली आहे. येत्या सात दिवसांत कार्यारंभाचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून क्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. १० : म्हाडामार्फत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये रहिवाशांना वीज, पाणी, रस्ते अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून इमारतींचा विकास करताना क्लस्टर आधारित विकास व्हावा, असा म्हाडाचा प्रयत्न असून या माध्यमातून रहिवाशांना अधिक सुविधा देता येतील, असे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, म्हाडामार्फत क्लस्टर आधारित विकास करताना काही सदनिका बाजारभावाने विकून निधी उभारला जातो. या माध्यमातून अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. जुन्या रहिवाशांना देखील या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच वाहनतळाची सुविधा दिली जात आहे. त्याचबरोबर काही प्रकल्पांमध्ये व्यायामशाळा, बाजारपेठ आदी सुविधाही दिल्या जात आहेत. यामध्ये यापुढे हरित क्षेत्राचा समावेश करण्याबाबत देखील विचार करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इमारतींचा विकास करताना विकासकास रेरा कायदा अनिवार्य असून याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ