अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर, दि. 10 : गत काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची घरे, शेती पिके व जनावरांची गोठे क्षतिग्रस्त झाली असून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी प्रशासनाला दिले आहे. तत्पुर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी अलर्ट मोडवर राहावे. अतिवृष्टीमुळे घरांचे, शेतातील पिकांचे, जे नुकसान झाले आहे, त्याचे तात्काळ आणि अचूक पंचनामे करण्यात यावेत. जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत मिळू शकेल.  पूरग्रस्त भागांत सुरक्षितता सुनिश्चित करावी. धोक्याच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व त्यांच्यासोबतच्या पशुधनाला सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.

पूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘वार रूम’ ची स्थापना करावी. या कक्षामार्फत सतत परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवून त्यामार्फत मदत व बचाव कार्याचे समन्वय साधावे. पुराच्या संभाव्य धोक्यांबाबत नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचे इशारे आणि माहिती देणारी यंत्रणा अखंडीत कार्यरत ठेवावी.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, बचाव कार्यासाठी नौका, जेसीबी, पंपसेट, बचाव पथक यांची तत्परता ठेवण्यात यावी. पूर पस्थितीमुळे प्रभावित नागरिकांसाठी अन्नधान्य, पिण्याचे पाणी व जीवनावश्यक औषधांचा साठा तयार ठेवण्यात यावा. आरोग्य विभागामार्फत आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवा व आरोग्य सुविधा तत्पर ठेवाव्यात. संभाव्य रोगराईचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

जिल्हातील पावसामुळे सर्वाधिक फटका ब्रम्हपुरी तालूक्याला बसला असून ब्रम्हपुरी तालुक्यासह चंद्रपूर, गोंडपिपरी, नागभीड व सावली व इतर तालुक्यांमध्येही जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाने वरील सर्व उपाययोजना युद्धपातळीवर अमलात आणाव्यात. तसेच नागरिकांनी देखील स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उईके यांनी केले.