पुणे, दि.१३: राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन त्यांचे भविष्य घडविणे राज्य शासनाची जबाबदारी असून स्वयंरोजगाराकरिता युवकांना राज्य शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय आणि हरीभाई व्ही देसाई कॉलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरीभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहायक आयुक्त सागर मोहिते, पोलीस सहायक आयुक्त सरदार पाटील, हरीभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपाध्यक्ष जनक शहा, सचिव हेमंत मणियार, सहसचिव दिलीप जगड यांच्यासह विविध कंपन्याचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. लोढा म्हणाले, पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या राज्यातील 5 लाख विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्याकरिता योजना विचाराधीन असून यामध्ये विविध तज्ञांद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.
जीवनात प्रचंड मेहनत केल्याशिवाय यश मिळत नसून यशाला कोणताही पर्यायी मार्ग नाही. कामाच्या अनुभवातून शिकवण घ्यावी. यशस्वी व्यक्तीच्या कौशल्याचे अनुकरण करावे. आपण जीवनात उत्तम काम करा. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याकरिता काम करावे. युवकांनो पुढे या, स्वयंरोजगार सुरु करा, त्यामध्ये नाविन्यता आणण्याबाबत विचार करावा. आजच्या रोजगार मेळाव्यात रोजगार न मिळालेल्या युवक व युवतींना कौशल्य विकासाच्यादृष्टीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सहकार्य करावे. कंपनीच्यावतीने या युवकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. लोंढा यांनी केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वाटचालीबद्दल माहिती देत प्रास्ताविकात श्रीमती पवार म्हणाल्या, या रोजगार मेळाव्यात २६ कंपन्यानी सहभाग घेतला असून त्याअंतर्गत २ हजार रिक्त पदे आहेत. युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता विभाग प्रयत्नशील आहे, युवकांनी या संधीचा लाभ घेऊन आयुष्यात यशस्वी व्हा. कंपन्यांनी युवकांचे आयुष्य घडविण्याकरिता काम करावे, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.
श्री. पाटील म्हणाले, समाजात विविध होतकरु व्यक्ती असून ते आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वयंरोजगार करुन यशस्वीपणे जीवन जगत आहेत. त्यामुळे नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसाय केला पाहिजे. युवकांनी सजग राहून परिसरातील नाविन्यपूर्णबाबींचे निरिक्षण करा, असा सल्ला श्री. पाटील यांनी युवकांना दिला.
यावेळी हरिभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे श्री. शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
000