परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे एक ते दोन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देश राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाचे अधिकारी, आयटीआयचे प्राचार्य यांना दिले.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्र औंध येथे कौशल्य विकास विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील आयटीआयचे प्राचार्य तसेच संस्था व्यवस्थापन समित्यांच्या सदस्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यवसाय प्रशिक्षण सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रतिभा चव्हाण, औंध आयटीआयचे उपसंचालक सचिन धुमाळ आदी उपस्थित होते.

आयटीआयच्या विद्यार्थांना आधुनिक काळाची गरज ओळखून नवनवीन कौशल्ये शिकविणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने न्यू एज कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित आयटीआयने आपल्या संस्थेत सुरू करावयाच्या अभ्यासक्रमाबाबतचे प्रस्ताव दिल्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. याशिवाय आपल्या संस्थेकडे कोणते नवीन आणि अधिक मागणी असू शकतील असे लोकप्रिय अभ्यासक्रम (पॉप्युलर कोर्सेस) देखील सुरू करावेत. याशिवाय तीन ते सहा महिन्यांचे छोटे अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यातून अधिकचे उत्पन्न मिळून संस्थेच्या विकासाला चालना मिळू शकेल.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विकास तसेच तेथील पायाभूत सुविधांचा पुरवठा, नवीन अभ्याक्रमांसाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीचा पुरवठा, वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एका प्राचार्याकडे एकाच संस्थेची जबाबदारी असेल यादृष्टीने भरतीच्या अनुषंगाने लवकरच प्रयत्न करण्यात येतील. न्यू एज अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर त्यासाठीची मशिनरीचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक संस्थेला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

संस्था व्यवस्थापन समिती आणि संस्थेचे प्राचार्य, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी यांच्यावर मोठी जबाबदारी असून संस्थेच्या प्रगतीसाठी ते मोठी भूमिका बजावू शकतात. या माध्यमातून राज्यातील मनुष्यबळाला कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करता येइल. त्यासाठी सर्वांनी भूमिका बजावावी, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी संस्था व्यवस्थापन समित्यांचे सदस्य तसेच आयटीआयचे प्राचार्य यांच्याकडून सूचना तसेच समस्या जाणून घेतल्या.
0000