मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला रुग्णांसाठी जीवनदायी !

मागील सहा महिन्यात ५८७ रुग्णांना ४ कोटी ९० लाखांची मदत

अहिल्यानगर, दि. १६ – जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आशेचा नवा किरण ठरला आहे. गेल्या पाच महिन्यांत या निधीच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य रुग्णांना देण्यात आले असून उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कक्षात दाखल अर्जांची तातडीने पडताळणी करून ते मुंबईकडे पाठवले जातात. कक्षाचे काम डॉ. निळकंठ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य स्वप्निल कच्छवे व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

या निधीतून कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीही रुग्णांना देण्यात येते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी कार्यरत असून नागरिकांनी थेट येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे.

सन २०२५ या वर्षात मागील सहा महिन्यात रुग्णांना देण्यात आलेली मदत

जानेवारी – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये,

फेब्रुवारी – २८ अर्जांना २२ लाख ७५ हजार रुपये,

मार्च – ४३ अर्जांना ३२ लाख २५ हजार रुपये,

एप्रिल – २९ अर्जांना २४ लाख ७० हजार रुपये,

मे – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये,

जून – ३२० अर्जांना २ कोटी ७३ लाख ६३ हजार रुपये,

१३ जुलैपर्यंत – १०३ अर्जांना ८७ लाख ३० हजार रुपये,

१ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू झाल्यानंतर मदतीच्या प्रमाणात जवळपास चारपट वाढ झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.

रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर दोन दिवसांत अर्ज दाखल केल्यास व कागदपत्रे पूर्ण असल्यास पाच दिवसांतच निधी संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. सध्या जिल्ह्यातील १०५ नोंदणीकृत रुग्णालयांमधून हा निधी मिळवता येतो.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया :

अर्जदारांनी निधीसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा स्थाननिश्चित (जीओ टॅग) केलेले छायाचित्रे, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक), तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे), आधारकार्ड, आजाराशी संबंधित निदानात्मक कागदपत्रे तसेच अपघातग्रस्त रुग्णासाठी पोलिसांचा एफआयआर, प्रत्यारोपणाच्या बाबतीत विभागीय समितीचा अहवाल अशी कागदपत्रे बंधनकारक आहेत.

अर्जदारांनी ही कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, २ रा मजला, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात थेट जमा करावीत किंवा ई-मेलद्वारे (aao.cmrf-mh@gov.in) पाठवावीत. अर्ज केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या साहाय्याने https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासता येते.

जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जीव वाचविणाऱ्या या वैद्यकीय मदत उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातर्फे करण्यात आले आहे.

००००