नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगरविकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव नगरविकास विभाग-2 डॉ. के.एच. गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर स्वच्छ महाराष्ट्र (शहरी) नवनाथ वाठ उपस्थित होते.
स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनामध्ये (ठाणे जिल्हा) मिरा भाईंदर महानगर पालिकेने 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त राधा बीनोद शर्मा त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले.
कराड नगरपालिका देशात दुसरी
कराड नगरपालिकाने 50 हजार ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले आहे. हा पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह मुख्य अधिकारी प्रशांत वटकर यांनी स्वीकारला
नवी मुंबई महानगरपालिकेने “सुपर स्वच्छ लीग सिटी” पुरस्कार पटकावला
10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गटात ( ठाणे जिल्हा ) नवी मुंबई महानगरपालिकेने “सुपर स्वच्छ लीग सिटी” पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वीकारला.
50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात (पुणे जिल्हा) लोणावळा नगरपालिकाने, 20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या गटात ( सांगली जिल्हा) विटा नगरपालिकाने, ( पुणे जिल्हा) सासवड नगरपालिका आणि ( अहिल्यानगर जिल्हा)देवळाली प्रवरानगर नगरपालिका , तर 20,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात ( सातारा) पाचगणी नगरपालिका आणि ( कोल्हापूर)पन्हाळा नगरपालिका या शहरांनी सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवले.
(पुणे जिल्हा) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 7 स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस ही दोन्ही मानांकनंही मिळवली आहेत. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महानगरपालिका, नगरपालिकांच्या टीमसह पुरस्कार स्वीकारले.
मिरा-भाईंदर मनपाची अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली
महाराष्ट्राने कचरा व्यवस्थापन, स्रोत पातळीवरील विलगीकरण, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छतेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य केले आहे. मिरा-भाईंदरने अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, मशीनद्वारे कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून हे यश संपादन केले. पिंपरी-चिंचवडने कचरा मुक्त शहर व वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
स्वच्छता सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत सर्व विजयी शहरांचे अभिनंदन केले. स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्याचा नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक करत ही चळवळ महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरत असल्याचे सांगितले. सफाईमित्रांचे योगदान उल्लेखनीय असून, मॅनहोलऐवजी मशीन-होलचा वापर वाढवण्याचेही त्यांनी आवाहन केले.
स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 अंतर्गत देशभरातील 4,500 हून अधिक शहरांचे 10 महत्त्वपूर्ण निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कचरा संकलन, स्रोत पातळीवरील विलगीकरण, पर्यावरणपूरक उपाययोजना, नागरिक सहभाग, आणि स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती यांचा समावेश होता. “रिड्यूस, रीयूज, रीसाइकल” ही या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना होती. एकूण 3,000 हून अधिक मूल्यांकनकर्त्यांनी 45 दिवसांच्या कालावधीत 11 लाखांहून अधिक घरे आणि परिसरांचे सर्वेक्षण केले असून 14 कोटी नागरिकांनी त्यात सहभाग नोंदविला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम 2016 पासून केंद्र शासनाने सुरू केला. हा उपक्रम शहरी स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ बनला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांनी दाखवलेली कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत असून, स्वच्छतेच्या दिशेने ही वाटचाल भविष्यातही वेगाने सुरू राहील, अशी अपेक्षा नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केली.
00000