मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, सहायक आयुक्त (बाजार) श्री. मनीष वळंजू, द मुंबई फ्रेश फिश डिलर्स संघटनेचे श्री. बळवंतराव पवार, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे श्री. देवेंद्र तांडेल आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे म्हणाले की, मुंबईच्या महात्मा जोतिबा फुले मंडईमध्ये मच्छिमार बांधवांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. येथील सोयीसुविधांबाबत मच्छिमार संघटनांकडून आलेल्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करून उपाययोजना करण्यात येतील. याठिकाणी उत्तम दर्जाची मंडई उभी राहावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, संघटनांनी मोर्चा काढू नये असे आवाहनही यावेळी मंत्री श्री. राणे यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी म्हणाले, महात्मा जोतिबा फुले मंडईमध्ये मासेविक्रीसाठी आवश्यक मूलभूत बाबींसोबतच वाहनतळ, उद्वाहन, मलनिसारण, रॅम्प आदी विविध दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरानुसारच ही मंडईसुद्धा आधुनिक बनवली जात आहे. मच्छिमार संघटनांच्या विविध मागण्यांचा विचार करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/