ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून ५ कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे,दि.१९ (जिमाका)-: उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानांतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलद गतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली.

ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला’ अभियानाचा आज ठाण्यातील लोकमान्य नगरमधील कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.कारखानीस, आदित्य बिर्ला फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लबचे महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते

गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी केले.

माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग, ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह तसेच हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबिरात करण्यात येणार आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.