सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंगारी (पनवेल) येथील नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

रायगड (जिमाका), दि. १९ : भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण परिक्षेत्राच्या मुख्य अभियंता सुषमा गायकवाड, पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य आणि अत्याधुनिक सोयींनी युक्त इमारतीबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “या इमारतीमुळे स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे व सुलभपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील. ही इमारत ही केवळ एक शासकीय सुविधा नसून, पनवेल तालुक्याच्या शासकीय प्रगतीचा नवा टप्पा ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

 

जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

राज्यातील रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक बांधकामे वेळेत पूर्ण करून जनतेला दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सतत प्रयत्नशील असून, ही कामे दर्जेदार आणि नागरिकांना उपयोगी ठरणारी असावीत, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

पनवेल येथील रा.मा. १०३ कि.मी. ३/८०० चिपळे येथे नेरे-मालढुंगे नवीन पुलाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर,  मुख्य अभियंता सा.बा.विभाग कोकण, सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग पनवेल, संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मंत्री भोसले म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी सर्व कामे ही दर्जेदार असली पाहिजेत.जनतेसह वाहनचालक व प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविल्या पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या चौफेर विकासासाठी बांधकाम विभागाने नियोजनबद्ध कामे हाती घेत आहे. सर्व प्रकारची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आणि त्यात गुणवत्ता राखणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

नेरे – मालढुंगे नवीन पूल सुरू झाल्यामुळे  नेरे आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांसाठी वाहतुकीची मोठी सुविधा निर्माण झाली असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासालाही या पुलामुळे चालना मिळेल, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.