विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी कटिबद्ध : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.21जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत शालेय स्तरावर अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व प्रयोगशीलता वाढवणे आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

निफाड तालुक्यातील विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे इंटरॲक्टिव्ह पॅनेल बोर्ड, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) कोर्स व अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उद्घाटन सोहळा कार्यक्रमात मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ दरेकर, सल्लागार कैलास सोनवणे, सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, सुनील मालपाणी, अनिल दरेकर, प्राचार्य नंदकुमार देवढे, विलास गोरे, पांडुरंग राऊत, माधव जगताप, राजाभाऊ दरेकर, सुमनताई दरेकर, जयंत साळी, सोहेल मोमिन यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सर्व समाजाप्रती शैक्षणिक योगदान मोलाचे असून “स्वावलंबी शिक्षण” हे  कर्मवीरांनी ग्रामीण महाराष्ट्रात रुजवले. त्यांचे नाव हे ग्रामीण शिक्षणाची मशाल आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाप्रती असलेला वैचारिक वारसा रयत शिक्षण संस्था पुढे नेत आहे.

अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, गणित या  विषयांचे आकर्षण वाढवणे, प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे शिकवणे, स्वतःचे मॉडेल तयार करणे, विचार प्रत्यक्षात आणणे यांचे शिक्षण यातून उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरासारखी आधुनिक सुविधा, उपकरणे, संगणकीय ज्ञान उपलब्ध होणार आहे. येथून प्रशिक्षित  उद्याचे नवोन्मेषक, स्टार्टअप उद्योजक, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनिअर होतील. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सदैव आपली जिज्ञासू वृत्ती जागरूक ठेवत सामाजिक भानही जपले पाहिजे. विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांची भूमिका जबाबदारीची असून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे. आज विकसित तंत्रज्ञानामुळे  शिक्षणाचे स्वरूप बदलेले आहे. त्यामुळे शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम अनिवार्य झाला आहे. मानवाच्या कल्याणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अतिशय महत्वाचा आहे. AI (एआय) चा उपयोग आरोग्य, शेती, शिक्षण, सुरक्षा, वाहतूक, बँकिंग, औद्योगिक उत्पादन अशा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढतो आहे. विविध क्षेत्रात याचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. त्यातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध असून भविष्यात ते यश मिळवू शकणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. शाळा परिसरातील पालखेड डावा कालव्यावर स्लॅब टाकण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून काम करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000