मुख्यमंत्री सहायता कक्ष गरजु रुग्णांना मायेचा आधार हिंगोली जिल्ह्यात दिली सहा महिन्यात ६ लाख १० हजारांची मदत

राज्यातील गोर-गरीब जनतेला दुर्धर आजारांवरील उपचारांचा खर्च भागविण्यासाठी विविध योजनांसोबतच तातडीच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यभर प्रभावी अंमलबजावणी  होत असून ही योजना गरजूसाठी मायेचा आधार बनली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक संजीवनी ठरली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जनतेलाही या उपक्रमाचा लाभ मिळावा व रूग्णांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य मिळविण्यासाठी  मुंबईकडे पायपीट करावी लागू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान जिल्ह्यातील गरजु व पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी एकूण 7 गरजु रुग्णांना 6 लाख 10 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळविण्यासाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई येथे अर्ज सादर करण्यास जावे लागत होते. त्यात बऱ्याच अडचणीही येत होत्या. ही अडचण दूर करून हिंगोली जिल्ह्यातील गोर गरीब रुग्णांना जिल्ह्यातच अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जानेवारी 2025 मध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हिंगोली येथे हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून जिल्ह्यातील गरजु व पात्र रूग्णांचे नातेवाईक गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी येतात व त्यांना कक्षाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून रुग्णावर उपचार करणाऱ्या संबंधित रुग्णालयास थेट वर्ग करण्यात येतो.

हिंगोली जिल्ह्यातील गरजु रुग्णांना जानेवारी ते आतापर्यंत 6 लाख 10 हजार रुपयांची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे जिल्ह्यातील सवंडकर नारायण मुंजाजी यांना 50 हजार, शांभवी गजानन सावळे यांना 2 लाख रुपये, सय्यद मुसा सय्यद रसूल यांना 50 हजार, सर्जेराव हंबीरराव ढोरे यांना 1 लाख रुपये, हिरालाल सुभाष पवार यांना 40 हजार रुपये, रामचंद्र मसाजी कुरवाडे यांना 1 लाख रुपये आणि शामराव किसनराव सुर्यवंशी यांना 70 हजार रुपये अशा एकूण 7 रुग्णांना 6 लाख 10 हजार रुपयाची मदत देण्यात आली आहे.

या आजारांसाठी मिळते मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त होण्यासाठी काही ठराविक आजार चिन्हित करण्यात आले आहेत. यामध्ये कॉकलियर ईम्प्लांट/अंतस्त कर्णरोपण शस्त्रक्रिया (वय ३ वर्षांपर्यंत), ह्रदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, अस्थी मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार, किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशुंचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात (दुचाकी), लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, ह्रदयरोग, डायलिसीस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात आणि विद्युत जळीत रुग्ण या आजाराचा समावेश आहे.

आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यात अर्ज, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, रुग्ण खाजगी रुग्णालयात असल्यास खर्चाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्रमाणित करणे, तहसील कार्यालयाचा वार्षिक 1 लाख 60 हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, रुग्णांचे आधार कार्ड व रेशन कार्ड महाराष्ट्राचे असावे. लहान बाळाच्या उपचारासाठी त्याच्या आईचे आधार कार्ड आवश्यक, संबंधित आजाराचे रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपणासाठी झेडटीसीसी/फार्म-19, अपघातग्रस्त, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघातग्रस्त रुग्ण यांच्यासाठी एफआयआर रिपोर्ट, पोलीस रिपोर्ट आवश्यक, रुग्णाचे ॲडमिट असलेले जिओ टॅग छायाचित्र आवश्यक आहे.

येथे करता येईल अर्ज

विहीत नमुन्यात मुळ अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह डॉ. नामदेव केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, हिंगोली येथे सादर करणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव केंद्रे (9850594181) यांच्याशी संपर्क साधावा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे गरजू व गोर गरीब जनतेला दुर्धर आजारावर उपचारासाठी आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे कठीण प्रसंगात मुख्यमंत्री कार्यालय सर्वसामान्यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याने पालकत्वाच्या भूमिकेतील मुख्यमंत्री यांच्या विषयीचा विश्वास सामान्य जनतेमध्ये वृद्धींगत होत आहे.

 

 – चंद्रकांत कारभारी

माहिती सहायक,

जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली