• तात्काळ खड्डे बुजवा
• मोबाईल सेवेला प्राधान्य द्या
• बस फेऱ्या वाढवून प्रवाशांना सुविधा द्या
सिंधुदुर्गनगरी दि.२१ (जिमाका) :- गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. सणासुदीच्या दिवसांत वीजपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्या. बीएसएनएल विभागाने कव्हरेज संदर्भात कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्या. या दिवसांत बाहेर जिल्ह्यातून बसने येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक राहणार असल्याने परीवहन विभागाने तसे नियोजन करावे. गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची सर्व यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
गणेशोत्सव आणि इतर सणांच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारा, पाऊस जास्त असतो त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी येथे विजेच्या अनेक समस्या आहेत. विज वितरण विभागाने करावयांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून तसेच नियोजन करुन दुरूस्तीची कामे तात्काळ हाती घ्यावीत. निधीची कमतरता भासू देणार नाही. १५ ऑगस्ट पर्यंत अत्यावश्यक कामे पूर्ण करावीत. धोकादायक पोल तात्काळ बदला. गांवपातळीवर वायरमन नेमावेत. चांगले काम करणाऱ्या वायरमनचा सत्कार करा असेही पालकमंत्री म्हणाले.
प्राधान्यक्रम ठरवून तात्काळ खड्डे बुजवावेत-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे ही गंभीर समस्या बनली आहे. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. यासह राज्य महामार्ग, जिल्हा परीषद अखत्यारीतील रस्त्यांची डागडूजी आणि दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. दुरूस्तीचे काम करत असताना प्राधान्य क्रम ठरवून कामे पूर्ण करा. कामात हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
मोबाईल नेटवर्क बाबत तक्रारी येता कामा नये-
बी.एस.एन.एल. नेटवर्क बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. गणेशोत्सवादरम्यान रेंज बाबत अनेक तक्रारी प्राप्त होतात. बी.एस.एन.एल. टॉवर आहेत मात्र त्या टॉवर वरून ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही. त्याबाबत तातडीने उपाययोजना करा. पुन्हा नेटवर्क बाबत तक्रारी येता कामा नये असे स्पष्ट आदेश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षत घ्यावी-
सिंधुदुर्गात दळणवळणाचे प्रमुख साधन एस.टी. आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जवळपास पाच हजार एसटी फेऱ्या होणार आहेत. परिणामी प्रवाशांची संख्या वाढणार आहे. हे लक्षात घेऊन परीवहन विभागाने नियोजन करावे. काही तांत्रिक कारणास्तव कोणत्याही शालेय व अन्य प्रवासी फेऱ्या रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिवाय त्या गावांतील सरपंच, मुख्याध्यापक, लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय ठेवावा. पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील बस डेपोंची प्रत्यक्ष पाहणी करा. गळती किंवा छत कोसळणे असे प्रकार होता कामा नये. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसचे नियोजन करा. प्रवाशांची गैरसोय होता कामा नये असेही ते म्हणाले.
आधुनिक अभ्यासक्रमांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी नियोजन करावे-
वाढवण बंदरासाठी आवश्यक असणारा कुशल कर्मचारी वर्ग जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. वाढवण बंदराच्या विकासामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. हे लक्षात घेऊन विभागाने नियोजन करावे. वेंगुर्ला,मालवण व देवगड या सागरी किनारपट्टीशेजारील तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव तयार करावेत. या प्रत्सावात अभ्यासक्रम, आवश्यक मनुष्यबळ तसेच इतर बाबींचा समावेश करावा असेही पालकमंत्री म्हणाले.