सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे शस्त्रक्रियागृह फेज 2, ग्रंथालय व डी. एस. ए. मशीन लोकार्पण, एसटीपी प्लँट कार्यारंभ व वसतिगृह, आंतररूग्ण व बाह्यरूग्ण विभाग दुरूस्ती कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, समित कदम, मकरंद देशपांडे, पदमाकर जगदाळे, डॉ. रूपेश शिंदे, डॉ. प्रिया हुंबाळकर आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या रूग्णालयात येणारा प्रत्येक माणूस बरा होवूनच जाईल, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षभरात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास 200 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 30 कोटी रूपये खर्चून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डिजिटल अँजीओग्राफी मशीन, व्हॅस्कुलर अँड इंटरव्हेन्शल रेडिओलॉजी विभाग मंजूर करण्यात आले. त्यामुळे मेंदु मधील गुंतागुंतीचे ऑपरेशन निदान, पॅरालायसीस, ब्रेन स्ट्रोक, याचे निदान करणे सोपे झाले आहे.
येणाऱ्या वर्षभरात सर्व आरोग्य सुविधा पूर्ण होतील व मिरज हे चांगले मेडिकल हब होईल, असा विश्वास व्यक्त करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सिव्हील हॉस्पिटल सांगलीसाठी एमआरआय व मिरज शासकीय रूग्णालयासाठी सिटी स्कॅन उपलब्ध करून देऊ. ग्रामीण व जिल्हास्तरावर आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून जेणेकरून रूग्णांना उपचारासाठी दूरवर मुंबईला जावे लागणार नाही. गोरगरीबांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या रूग्णालयात ज्या त्रुटी आहेत त्या वर्षभरात पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवून त्यांना निरोगी करावयाचा संकल्प करू. रूग्णालयात येणाऱ्या माणसांची चांगली सेवा करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नायकवडी, समित कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. रूपेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास शासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक, डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000