Ø जाजू महाविद्यालयात रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्ती प्रतिसाद
Ø मंत्र्यांच्याहस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण
यवतमाळ, दि.23 (जिमाका) : युवकांच्या हाताला काम देणे शासनाचे प्राधान्याचे धोरण आहे. त्यामुळेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जाजू कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॅाम्पूटर सायन्सच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जाजू महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, सहाय्यक आयुक्त प. भ. जाधव, जाजू कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश जाजू, प्राचार्य रितेश चांडक, सचिव आशिष जाजू, कोषाध्यक्ष शिल्पा जाजू, प्रफुल चव्हाण उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी चित्रफितीद्वारे मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
आ.बाळासाहेब मांगुळकर यांनी सुद्धा उमेदवारांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी कोणतेही काम छोटे नसते. स्वतःमध्ये कौशल्य विकसित करा. छोट्या कामापासून सुरुवात केली तर मोठी संधी नक्कीच मिळते, असे सांगतांना नोकरीच्या भरवशावर न राहता स्वतःमध्ये उत्तम कौशल्य विकसित करा व चांगले जीवनमान जगा असे सांगितले.
मेळाव्यामध्ये 15 नामांकीत कंपन्यामार्फत एकुण 470 रिक्तपदाकरिता नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यास 707 उमेदवारांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला. त्यातील 196 उमेदवारांची प्राथमिक तर 119 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यापैकी 48 उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीच्या ठिकाणी नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले आहे. मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशान्वये संपुर्ण राज्यात एकाचवेळी घेण्यात आला. मेळाव्यास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा.संजय देशमुख, जिल्हाधिकारी विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, प्रथम एज्युकेशन फांऊडेशन, इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, खादीग्राम उद्योग महामंडळ, महात्मा फुले आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक वित्त विकास महामंडळाने आपल्या स्टॉलद्वारे विविध योजनांची माहिती उमेदवारांना दिली. मेळाव्यास आयटीआय प्रशिक्षणार्थी, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमधील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सहायक आयुक्त प.भ.जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाचे सुचिता घाडगे, राहुल गुल्हाणे, नितीन खडसे, संदीप यादव, सुचित वाटगुरे, निलेश भगत तसेच जाजु कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
00000