विभागांनी अनुकंपा नियुक्तीची कारवाई कालमर्यादेत करावी – पालकमंत्री संजय राठोड

अनुकंपा भरतीचा 150 दिवस विशेष मोहिमेत समावेश

भरतीच्या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांची बैठक

यवतमाळ, दि.23 (जिमाका) : राज्य शासनाने 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीची कालमर्यादा निश्चित करून दिली आहे. विभागांनी या मर्यादेत अनुकंपा पदे निश्चित करून वेळेत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व विभागांना दिले आहे.

राज्य शासनाच्या 150 दिवस विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना कालमर्यादेत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जास्तीत जास्त अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी शासनाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा सूची अद्ययावत करणे, उमेदवारांच्या विनंतीनुसार गट बदलण्याची कार्यवाही, अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची परिगणना, गट ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जिवित करण्याचे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. ही सर्व प्रक्रिया दि.15 ऑगस्ट पर्यंत पुर्ण करावयाची आहे. दि.18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी याबाबत बैठक घेऊन अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदे व नियुक्तीच्या अनुषंगाने माहिती घेणार आहे.

त्यानंतर जिल्ह्याची गट क ची सामायिक प्रतिक्षासूची अद्ययावत केली जातील. तसेच नियुक्तीस उपलब्ध पदसंख्या प्रसिद्ध करण्यात येतील. नियुक्त प्राधिकाऱ्याच्या यादीप्रमाणे गट ड च्या पदावर नियुक्तीसाठी सिफारस केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या सिफारसीनुसार गट ड ची मृत करण्यात आलेली पदे नियुक्ती देण्यासाठी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येतील. ही प्रक्रिया दि.22 ऑगस्ट पुर्वी पुर्ण करण्यात येणार आहे.

अनुकंपा उमेदवारांचा दि.1 सप्टेंबर रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात उमेदवारांची नियुक्तीसाठी सिफारस करण्यात येतील. त्यापुर्वी विभागाच्यावतीने गट ड ची मृत पदे पुनर्जीवित करण्याची कार्यवाही पुर्ण करण्यात येणार आहे. दि.15 सप्टेंबर रोजी गट क च्या व पुनर्जीवित केल्या गट ड च्या सिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. याप्रमाणे शासनाने निर्धारीत केल्याप्रमाणे विभागाने कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुकंपा भरतीचा आढावा

शासनाने अनुकंपा नियुक्तीसाठी निर्धारीत केलेला कालबद्ध कार्यक्रम व पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशान्वये प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सर्व नियुक्ती प्राधिकारी तथा विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी उपस्थित होते. शासनाने जो कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. त्याप्रमाणे कारवाई करून पुढील बैठकीत आपल्या विभागाची माहिती सादर करण्याच्या सूचना श्री.खंडागळे यांनी केल्या.

00000