क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहिल्यानगर दि.२७ – आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श या पूर्णाकृती स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या आपण सर्वांना मिळत राहील, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

शहरातील माळीवाडा वेस येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अभय आगरकर, सचिन जगताप, अक्षय कर्डीले, माणिकराव विधाते, नितेश भिंगारदिवे, माजी आयुक्त पंकज जावळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाला व राज्याला अनेक महापुरुष व महान स्त्रियांनी योग्य मार्ग दाखवला. त्यांच्याच विचारांचा आदर्श घेत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन राज्य शासन काम करत आहे. आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा अनुभव घेत त्या आपले योगदान देत असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील महापुरुष व महान स्त्रियांची स्मारके उभारण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. यासाठी पावणेसातशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव याजन्मगावी १०० कोटी रुपये खर्च करून प्रत्येकाला अभिमान वाटेल असे भव्य स्मारक उभे केले जात आहे. जिल्ह्यातील महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे टप्याटप्याने पूर्णाकृती स्वरूपात उभारण्यात येतील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

असे आहे स्मारक –

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक स्त्री शिक्षणाचे प्रतीक म्हणून साकारण्यात आले असून, यामध्ये महात्मा फुले यांचा १० फूट उंचीचा आणि सावित्रीबाई फुले यांचा ९ फूट उंचीचा कास्य धातूपासून बनवलेला पुतळा आहे. त्याचबरोबर शाळेत जात असलेल्या ४ फूट उंचीच्या एका लहान मुलीची मूर्तीही समोर स्थापित करण्यात आली आहे. या तिन्ही शिल्पांचे एकूण वजन सुमारे १८०० किलोग्रॅम आहे.

स्मारकाच्या परिसरात भिडे वाड्यातील प्रेरणादायी पाच भित्तीचित्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्त्री शिक्षण, हुंडा प्रथेविरोध, सती प्रथा, सामाजिक विषमता आणि फुले वाड्यातील जीवनदृष्यांचा समावेश आहे. पुतळा निर्मितीसाठी ५० लाख ६० हजार रुपये इतका खर्च आला आहे.सुशोभीकरणासाठी ४१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.