थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी ११ वी प्रवेशावेळी तपासणीबाबतचा प्रस्ताव तयार करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

थॅलेसेमियाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान

मुंबई, दि. ३० : थॅलेसेमिया हा एक रक्ताचा अनुवांशिक आजार आहे. ज्यामध्ये शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन तयार होत नाही. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होवून थकवा, अशक्तपणा जाणवतो. या आजाराबाबत जनजागृतीसाठी थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी ११ वीच्या प्रवेशावेळी तपासणी सक्तीची करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्यसेवा आयुक्तालय येथे आयोजित थॅलेसेमिया आजार नियंत्रणाबाबत आढावा बैठकीत मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर बोलत होते. यावेळी बैठकीला आरोग्य सेवा डॉ.आयुक्त कादंबरी बलकवडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक  डॉ. पुरुषोत्तम पुरी,  मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी अतुल वझे, प्रमोद गोजे, जनकल्याण समितीचे प्रदीप पराडकर, अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, सिकलसेल आजार हा राष्ट्रीय कार्यक्रमात असल्याने त्यामध्ये थॅलेसेमिया आजाराचा समावेश करण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना करणार आहे. थॅलेसेमियाबाबत जनतेमध्ये व्यापक जनजागृती निर्माण होण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आता केवळ गर्भवती महिलांची तपासणी केली जाते, ती सक्तीची केली तर थॅलेसेमियामुक्त वाटचाल अधिक सुलभ होईल.

आजाराच्या प्रतिबंधाबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत समुपदेशन मोहीम राबविणे आवश्यक आहे. महाविद्यालयस्तरावर आरोग्य, शिक्षण आणि प्रबोधन गरजेचे असून थॅलेसेमियाबाबत व्यापक जनजागृतीद्वारे नवी पिढी सुदृढ  होईल, असेही त्यांनी सांगितले.

थॅलेसेमिया निर्मूलनासाठी राज्यस्तरीय समिती

थॅलेसेमिया निर्मूलनासाठी आरोग्यसेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करावी. या समितीमध्ये सामाजिक संस्था, रेडक्रॉस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश असावा. समितीला कालमर्यादा ठरवून काम सुरू करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश मंत्री श्री आबिटकर यांनी दिले.

बैठकीत थॅलेसेमिया आजाराचे निदान, उपचार, प्रतिबंध व त्याबाबतचे प्रशिक्षण, रुग्णांसाठीच्या कल्याणकारी योजनाबाबत डॉ पुरी यांनी माहिती दिली. जनकल्याण समितीच्या वतीने राज्यभर विविध सेवाभावी संस्थाच्या मदतीने थॅलेसेमियाबाबत करीत असलेल्या कामकाजाची तसेच प्रबोधनाची माहिती श्री कुलकर्णी यांनी दिली.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं/