मुंबई, दि. ३० : मुलुंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलामध्ये सर्व आधुनिक क्रीडा सुविधा असाव्यात आणि हे संकुल सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी तत्वावर) विकसित केले जावे, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
मुलुंड (पूर्व) येथील प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलाच्या कामकाजाबाबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार मिहीर कोटेचा, अपर मुख्य सचिव अनिल डिकेकर, उपसचिव सुनील पांढरे आणि कक्ष अधिकारी रणसिंग डेरे, आयुक्त शितल तेली-उगले, उपसंचालक नवनाथ फडतरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, उपस्थित होते.
मंत्री श्री.भरणे म्हणाले की, हे संकुल शालेय स्पर्धा व जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी दिले जाईल. या क्रीडा संकुलामध्ये मल्टीपर्पज हॉल (४ बॅडमिंटन कोर्ट्स, वुडन फ्लोअरिंगसह), अत्याधुनिक जिम, ऑलिंपिक साईज जलतरण तलाव, स्टोअर रूम. (कॉम्बॅट स्पर्धा, योगा, सेमिनार), विविध खेळांची मैदाने, शौचालय, बाथरूम, चेंजिंग रूम्स, पार्किंग या सुविधा आवर्जून उपलब्ध करून द्यावात असेही मंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.
सध्या मुलुंडमध्ये महानगरपालिकेचे एकमेव क्रीडा संकुल असून, येथे क्रीडा कौशल्य असलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे एक सुसज्ज व बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारले जाणे गरजेचे आहे. हे संकुल शालेय व जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी खुले करण्यात येणार असून, इंडोअर गेम्सला विशेष प्राधान्य दिले जाईल. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही मंत्री श्री.भरणे यांनी यावेळी सांगितले.
000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/