मुंबई, दि. ३०: पुनर्वसित गावांमध्ये देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत नव्याने नियमावली, कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागाने या कामास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील शीघ्रगतीने पूर्ण करावयाच्या प्रकल्पाचा जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सह सचिव प्रसाद नार्वेकर यांच्यासह गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे, शेतकऱ्याला मुबलक पाणी मिळावे यासाठी सिंचन प्रकल्प, योजना राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येते. पुनर्वसित लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. पुनर्वसित गावठाणे आदर्शवत असावीत यासाठी नवी नियमावली तयार करावी.
गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील शीघ्रगतीने पूर्ण करावयाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणाले, या योजनांची कामे कालबध्द पद्धतीने पूर्ण करून सिंचनाचे अधिकाधिक क्षेत्र निर्माण करावे. यासाठी लागणारा निधी शासनस्तरावरून उपलब्ध करुन दिला जाईल. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करावी.
या बैठकीत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतरण करणेबाबतच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिले. तसेच ज्या पुनर्वसित गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला अशा गावातील यापुढील विकासकामे करण्यासाठी अशी पूनर्वसित गावे जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
०००००
एकनाथ पोवार/वि.सं.अ