मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील २,७३८ रूग्णांना २५ कोटी ८६ लाखांची मदत

मुंबई, दि. ३१ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यामध्ये २,७३८ रूग्णांना तब्बल २५ कोटी ८६ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

 २० गंभीर आजारांसाठी मदत –

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे :-

  • रूग्णाचे आधार कार्ड
  • रूग्णाचे रेशन कार्ड
  • रूग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टँग फोटो जोडणे बंधनकारक आहे.
  • तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे)
  • संबंधित आजाराचे वैद्यकिय रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
  • अपघात ग्रस्त रूग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट आवश्यक आहे.
  • अवयव प्रत्यारोपण रूग्णांसाठी झेडटीसीसी नोंदणी पावती आवश्यक आहे.

सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत.  अधिक माहिती करिता टोल फ्री क्र. 1800 123 2211 या क्रमांकावर कॉल

कोकण विभागातील मदतीचा आढावा (१ जानेवारी ते ३० जुलै २०२५)

जिल्हा            एकूण रुग्णसंख्या     एकूण मंजूर मदत रक्कम

मुंबई शहर                 ४२८                 ४ कोटी ०१ लाख १५ हजार

मुंबई उपनगर              ३९२                 ३ कोटी ६१ लाख २९ हजार

ठाणे                         १३३८               १२ कोटी १० लाख १० हजार

पालघर                     १५३                  १ कोटी २८ लाख ४१ हजार

रायगड                      २१९                 १ कोटी ९७ लाख ०३ हजार

रत्नागिरी                    १६४                 १ कोटी ३० लाख ६० हजार

सिंधुदुर्ग                      ४४                  ५७ लाख ७९ हजार

 

संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रूग्णांना मदत केली जाणार असल्याचे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

०००