जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३१ : जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्रात क्रीडा प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक क्रीडा प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली येथे ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत “खेलो इंडिया” योजनेअंतर्गत देशभरात १००० खेलो इंडिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.  या योजनेचा उद्देश  मुलांना प्रशिक्षित करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी अधिकाधिक खेळाडू घडविणे हा आहे. या योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त केंद्रांवर शासकीय मार्गदर्शक, अनुभवी प्रशिक्षक व माजी गुणवंत खेळाडू हे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत.

प्रशिक्षकाची वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असून, उच्च दर्जाची गुणवत्ता व कामगिरी असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्षांपर्यंत वयाचे उमेदवारही प्रशिक्षक पदासाठी पात्र ठरू शकतात. प्रशिक्षकांना ऑलिंपिक, एशियन गेम्स, जागतिक अजिंक्यपद, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार, एनआयएस पदविका, अधिकृत लेवल कोर्सेस, बीपीएड/एमपीएड व किमान १० वर्षांचा अनुभव यांपैकी एक किंवा अधिक अर्हता असणे आवश्यक आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ या पत्त्यावर सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यकारी अधिकारी, श्रीमती प्रिती टेमघरे (मो. ९०२९२५०२६८) व श्री. अभिजित गुरव (मो. ८१०८६१४९११) अथवा 20890717 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ