“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली.

सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी स्वयंसेवकांना कायद्याविषयी प्रशिक्षण देण्याचा हा २३ वा उपक्रम होता. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात महिला, मुली आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, चोरी किंवा लहान मुलांच्या अपहरणासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे हा होता. या कार्यक्रमात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी २० पोलीस ठाणे येथील दक्षता समितीच्या महिलांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख यांनी ‘सण आणि महिला सुरक्षितता: कायदेसंरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका’ या विषयावर संवाद साधला. स्त्री आधार केंद्र आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी काम करताना कोणतीही समस्या सोडवणे अधिक परिणामकारक आणि सुलभ होते. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी नेहमीच अत्यंत उपयुक्त ठरते असे श्री देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोपट येले यांनी स्फोटके आणि बॉम्बशोधक पथकाच्या जबाबदारीबद्दल माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक श्री. विवेक नायडू यांनी शहरी आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गणेशोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे, मात्र सार्वजनिक गर्दीत महिलांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. स्वयंसेवकांची उपस्थिती महिला, मुली आणि लहान मुलांसाठी खूप आश्वासक असेल. तसेच, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या प्रत्येक महिला कार्यकर्त्याच्या योगदानाला त्यांनी दाद दिली.

 यावेळी, फ्रान्समधील जीझेल पेलिकॉ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे उदाहरण देत, डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक अन्यायग्रस्त महिलेने त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. या कार्यशाळेमुळे पुणे शहरातील गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत सामाजिक यंत्रणा तयार होत आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणाचा अनुभव कार्यकर्त्यांना आगामी काळात काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेमार्फत राज्यभरात महिलांसाठी बचत गट आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात. प्रशिक्षित स्वयंसेवक गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या वेळी पोलिसांना मदत करतील. गेल्या वर्षी देखील या स्वयंसेवकांनी हरवलेल्या लहान मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केली होती. गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार करणे, छेडछाड थांबवणे, आणि गरजेनुसार मदत पुरवणे अशा अनेक कामांसाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.

000