नंदुरबार, दिनांक 03 ऑगस्ट, 2025 (जिमाका) : निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे व तालुके कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘संपूर्णता’ अभियानामध्ये नंदुरबार जिल्हा व अक्राणी तालुक्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉपर’ आणि ‘ब्रॉंझ’ पदकाने गौरविण्यात आले आले. तसेच, डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आरोग्य धमणी’ या एकात्मिक आदिवासी आरोग्य सेवा बळकटीकरण मॉडेलची नीती आयोगाच्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम उपक्रमांमध्ये (Best Practices) सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय समारंभाचे आयोजन नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने ‘संपूर्णता’ अभियानातील सहापैकी तीन निर्देशांक (Indicators) पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे अक्राणी तालुक्याने चार निर्देशांक पूर्ण करून विशेष कामगिरी बजावली आहे.
या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, सर्व विभागीय आयुक्त व अन्य मान्यवर उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्याने आरोग्य, पोषण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील निर्देशांकांवर विशेष भर दिला. या यशामागे जिल्हा प्रशासनाचे नियोजनबद्ध कार्य, विभागीय समन्वय, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, कृषी विभाग, महिला बचत गट यांचा सक्रिय सहभाग आणि स्थानिक जनतेचे मिळालेले समर्थन, हे घटक महत्त्वाचे ठरले.
या यशात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय समन्वयक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून, विशेषतः अक्राणी तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिद्द, चिकाटी आणि समर्पण भावनेने केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.
‘आरोग्य धमणी’ला राष्ट्रीय पातळीवर संधी !
डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘आरोग्य धमणी’ हे एकात्मिक आदिवासी आरोग्य सेवा
बळकटीकरण मॉडेल नीती आयोगाच्या देशपातळीवरील सर्वोत्तम उपक्रमांमध्ये निवडले गेले आहे. या उपक्रमाचे सादरीकरण 7 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली येथे होणार असून, यावेळी डॉ. मित्ताली सेठी ओडिशा व मेघालयच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत हे मॉडेल सादर करतील.
“हे यश जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित आहे. आपण एकजुटीने काम
करत राहिलो, तर नंदुरबार जिल्हा विकास, संधी आणि सन्मानाचा आदर्श ठरेल. विशेषतः अक्राणी तालुक्याला ‘आकांक्षित तालुका’ श्रेणीत पदक मिळाल्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे,” अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी व्यक्त केली.
00000