आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. 6 : रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे आंबडवे (ता. मंडणगड) येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा, अशा सूचना गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न  व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या.

मौजे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या विकास संदर्भात राज्यमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांच्यासह रत्नागिरी जिल्हा समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

VIRENDRA DHURI

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, मौजे आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वारसा आहे. या स्मारकाचा विस्तार व पुनर्विकास करताना स्मारक परिसरातील काही घरांचे व कुटुंबांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.  या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महसूल व समाजकल्याण विभागाने पर्यायी जागा शोधावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ