नवी दिल्ली, 6: कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गच्या चौपदरी द्रुतगती महामार्गात रूपांतरची मागणी, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. तसेच,सारंगखेडा येथील तापी नदीवरील नवीन पूल बांधण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंतीही केली.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणारा कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा हा राष्ट्रीय महामार्ग सध्या दोनपदरी आहे. वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण अत्यंत आवश्यक बनले आहे. याबाबत जयकुमार रावल यांनी नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा महामार्ग द्रुतगती चारपदरी मार्गात विकसित करण्याची मागणी केली. याशिवाय, सारंगखेडा येथील तापी नदीवरील नव्या आधुनिक पुलाच्या बांधकामाला गती देण्याची मागणीही त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तात्काळ तयार करण्याचे निर्देश दिले.
या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी आशा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.
0000