‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ सोहळा
मुंबई, दि. ६ : “समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा केवळ गौरव नव्हे, तर समाजातील इतरांनाही प्रेरणा देण्याचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
मेघाश्रेय या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मुंबईत आयोजित ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ सोहळ्यात राज्यपाल श्री. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. रामामूर्ती, मेघाश्रेय संस्थेच्या संस्थापिका सीमा सिंह आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पद्म पुरस्कार विजेते, मान्यवर शास्त्रज्ञ, नामवंत क्रीडापटू, समाजसुधारक, शिक्षक, आरोग्य तज्ज्ञ आणि आरोग्य नवोन्मेषक, ज्येष्ठ पत्रकार, चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार, तसेच बीज माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्या नगरच्या श्रीमती राहीबाई पोपरे आणि हिवरे बाजारचे परिवर्तन घडवणारे पोपटराव पवार यांच्यासारख्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
सर्व सन्मानित व्यक्तींनी समाजाला उज्ज्वलतेच्या दिशेने नेण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घ्या आणि देशाच्या विकासात योगदान द्या, असे आवाहन राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
भारत आज आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये निर्णायक भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मविश्वासाने वाटचाल केली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, विकास हा सर्वसमावेशी असावा. अनुसूचित जाती-जमाती, महिलांपासून ते दिव्यांग व तृतीयपंथीयांसह सर्व समाजघटकांचा विकास झाल्यास ‘विकसित भारत’ हे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांमध्ये जर्मन, फ्रेंच, जपानी, इटालियन, कोरियन अशा परदेशी भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात, यासाठी कुलगुरूंना प्रोत्साहन दिले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मेघाश्रेय संस्थेच्या श्रीमती सीमा सिंग यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालशिक्षणासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. सन्मान मिळालेल्या मान्यवरांचे कार्य ‘समाजासाठी दीपस्तंभ’ ठरत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी सर्वोत्तम नागरिक सन्मान कॉफीटेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पद्मविभूषण विजय भाटकर, ज्येष्ठ संगीतकार व गायक पद्मश्री शंकर महादेवन, चित्रपट निर्माता इम्तियाज अली, ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. अश्विन मेहता, पत्रकार नाविका कुमार, प्रा. रवींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ गायक कुमार शानू, अभिनेता व दिग्दर्शक अजिंक्य देव, जिगर सचिन बॉक्सिंग खेळाडू विजेंद्र सिंग, बीज माता पद्मश्री राहिबाई पोपरे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. इंदू सहानी, पद्मश्री पोपटराव पवार, महिला चळवळीतील डॉ. वर्षा देशपांडे, हनुमान केंद्रे आदींना सर्वोत्तम नागरिक पुरस्काराने गौरविण्यात आले.
0000
नंदकुमार वाघमारे/ वि.सं.अ/