हतनूर धरण प्रकल्प; ११ गावांच्या पुनर्वसन संदर्भात सकारात्मक मार्ग काढू – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि. ६ : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील हतनूर धरण प्रकल्पातील ११ गावांच्या पुनर्वसन संदर्भात मदत व पुनर्वसन विभाग आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक लवकरच घेऊन या प्रश्नी सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील पुनर्वसनाच्या अडचणी सोडवणे संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीस आमदार चंद्रकांत पाटील, सह सचिव (पुनर्वसन) संजय इंगळे, जलसंपदा विभागाचे सह सचिव तथा मुख्य अभियंता संजीव टाटू, उप सचिव (पुनर्वसन) श्री. बागडे, अधीक्षक अभियंता व उपसचिव रोशन हटवार, अवर सचिव संदीप भालेराव, जळगांवचे कार्यकारी अभियंता उत्तम दाबाडे आदी  उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले, हतनूर धरण प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसन करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करावा.  या ११ गावांव्यतिरिक्त अन्य कोणत्या गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे व त्यास जलसंपदा विभागाची मान्यता असल्यास मदत व पुनर्वसन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाईल.

मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणाले, हतनूर धरण प्रकल्पामुळे यापूर्वी ज्या गावांचे पुनर्वसन झाले आहे व त्या पुनर्वसित गावात नागरी सुविधांची कामे  अपूर्ण आहेत, याबाबत गावनिहाय व अपूर्ण कामांचा प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावासही नियमानुसार मान्यता दिली जाईल. तसेच मुक्ताईनगर येथील ज्या पुनर्वसित कुटुंबांना अद्यापि घरासाठी भूखंड वाटप झाले नाही त्यांना तत्काळ भूखंड वाटप करावे, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ/