मुंबई, दि. 6 : चर्मकार समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन अत्यंत सकारात्मक असून, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
मंत्री श्री.शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली चर्मकार समाजाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी खासदार राहुल शेवाळे, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टी चे महासंचालक सुनील वारे, तसेच चर्मकार संघटनेचे प्रतिनिधी, विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.शिरसाट म्हणाले, महामंडळाच्या विविध योजनांच्या अटी व शर्ती शिथिल करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याबाबतच्या कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्यात चर्मोद्योगाला चालना देण्यासाठी क्लस्टर आधारित धोरण तयार करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले. मागील काही वर्षांपासून कालबाह्य झालेल्या योजनांचा अभ्यास करण्यात येत असून, त्यांचा नव्याने पुनर्विचार करून त्या काळानुरूप स्वरूपात पुन्हा तयार करण्यात येणार आहेत. या योजनांद्वारे चर्मकार समाजातील नागरिकांना अधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. उद्योगांसाठी फिरते स्टॉल देण्याची योजनाही राबविण्यात येणार आहे. तसेच गटई कामगारांना स्टॉल देणेबाबत नगरविकास विभागासोबत बैठक घेण्यात येईल असेही मंत्री श्री.शिरसाट यांनी यावेळी सांगितले.
००००
शैलजा पाटील/विसंअ