मुंबई, दि. ६ : महाव्यवस्थापक, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.एस.व्ही.आर. श्रीनिवास (भाप्रसे) यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०५ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या आदेशान्वये यांच्याकडे सोपविण्यात आला होता. श्री.एस.व्ही. आर. श्रीनिवास, हे दि.३१ जुलै, २०२५ (म.नं) रोजी शासन सेवेतून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. श्री.एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागामार्फत दि.३१ जुलै, २०२५ रोजी आदेश निर्गमित केले होते. या आदेशानुसार श्री.एस.व्ही.आर. श्रीनिवास, भाप्रसे यांनी महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव (नवि-२), नगरविकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्याबाबत निर्देश प्राप्त झाले होते.
‘बेस्ट वर्कर्स युनियन या कामगार संघटनेच्या पुढाकाराने बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना (ग्रॅज्युइटीची) उपदानाची रक्कम तातडीने विहित वेळेत मिळण्याकरीता मोर्चा काढण्याचे नियोजित होते. या परिस्थितीमध्ये सामान्य प्रशासन विभागामार्फत नियमित आदेश निर्गमित करेपर्यंत महाव्यवस्थापक, बेस्ट या पदाचा अतिरिक्त कार्यभार देणे आवश्यक होते.
सामान्य प्रशासन विभागाचे दि.३१ जुलै, २०२५ रोजीचे आदेश विचारात घेता कामगार संघटनेचा मोर्चा हाताळण्याच्या दृष्टीने महाव्यवस्थापक, बेस्ट या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अश्विनी जोशी, (भाप्रसे) यांच्याकडे सोपविण्याबाबत नगरविकास विभागामार्फत आदेश काढण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत होती. तथापि, या दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत दि.०५ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या आदेशान्वये महाव्यवस्थापक, बेस्ट या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. आशिष शर्मा (भाप्रसे) यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे नगरविकास विभागामार्फत महाव्यवस्थापक, बेस्ट या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अश्विनी जोशी, भाप्रसे यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश अधिकृतरित्या निर्गमित करण्यात आलेले नाहीत, असा खुलासा नगरविकास विभागाने केला आहे.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ