मुंबई, दि. 7 : राज्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया वाढविण्यात याव्यात, अमली पदार्थविरोधी कृती दलांच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी जागा शोधणे, त्याठिकाणी कार्यालये सुरू करणे, पदभरती करणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन पूर्वक कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या.
मंत्रालय येथे आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री.कदम बोलत होते. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपसचिव राहुल कुळकर्णी, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आदी उपस्थित होते.

शासनाने अमली पदार्थविरोधी कृती दलाची (अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स) स्थापना केली आहे. या कृती दलामध्ये तातडीने पदभरती करण्याची कार्यवाही पूर्ण करून ही दले अधिक सक्षमतेने कार्यान्वित करावी, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.कदम यांनी दिले.
राज्यमंत्री श्री.कदम म्हणाले, अमली पदार्थ विक्री, खरेदी, वाहतूक आणि प्रतिबंध करण्यासाठी कारवाया करण्यात येतात. याप्रकरणी न्यायालयात दाखल खटले तातडीने निकाली काढण्यासाठी कार्यवाही करावी. प्रलंबित खटल्यांची तपशिलवार माहिती नियमित स्तरावर सादर करावी. अमली पदार्थविरोधी कृती दलांची क्षेत्रीय कार्यालये सुरू करावीत. या दलामध्ये अधिकारी व कर्मचारी रुजू होण्यासाठी विशेष भत्ता, पुढील पदाचे वेतन देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा.
अमली पदार्थ बऱ्यापैकी सागरी मार्गाने येतात. त्यामुळे सागरी किनारी भागातील अंमली पदार्थ विरोधी दलाला काही विशेष उपकरणे, वाहने देण्यात यावीत. किनारी भागात होणाऱ्या अमली पदार्थ खरेदी, विक्रीवर लक्ष ठेवून कारवाया वाढविण्यात याव्यात, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिल्या.
0000
निलेश तायडे/वि.सं.अ/