- प्रशासकीय मान्यताप्राप्त कामांना आठवडाभरात कार्यारंभ आदेश द्या
- कामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : राज्यस्तरीय यंत्रणांनी सन 2024-25 मधील प्रशासकीय मान्यताप्राप्त मंजूर सर्व कामे त्वरित सुरू करून, ती गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. तसेच, चालू आर्थिक वर्षातील प्रस्तावित कामांचे प्रस्ताव 25 ऑगस्टपूर्वी प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत. नियोजन विभागाच्या सुधारित कार्यपद्धतीप्रमाणे पायाभूत सुविधांच्या कामांकरिता यापुढे ऑनलाईन युनिक आय डी क्रमांक आवश्यक असून, त्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत राज्यस्तरीय यंत्रणाकडील कामांच्या योजनानिहाय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपवनसंरक्षक सागर गवते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह संबंधित यंत्रणांचे विभाग/कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक विभागाने देशाच्या स्वातंत्र्यांच्या शतकवर्षापर्यंत सन 2029, 2035 व 2047 अशा तीन टप्प्यात करावयांच्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करावा. कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा. जिल्ह्याचा शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने या तीन टप्प्यांत नियोजन करावे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण होतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांना आगामी काळात आपण स्वतः तसेच, जिल्ह्याच्या पालक सचिव प्रत्यक्ष भेट देणार आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला बालविकास विभागाने एकल महिलांचे सर्वेक्षण करावे. त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध करून द्यावेत. स्वयंसहाय्यता गटातील महिलांची क्षमता बांधणी करून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये सौरऊर्जा युक्त करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव द्यावेत. पाटबंधारे विभागाने पूर संरक्षक भिंत, घाट बांधकाम अशी प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. वन विभागाकडे विविध योजनांसाठी आवश्यक परवानग्यांसाठी आलेल्या प्रस्तावांसंदर्भात एकत्रित आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. वनपर्यटनासाठी जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करावा.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नियोजन विभागाकडील सुधारित कार्यपद्धतीप्रमाणे सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत कामांना सप्टेंबरअखेर प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. तसेच, प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी पायाभूत सुविधांच्या कामांकरिता प्रत्येक विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेला ऑनलाईन युनिक आय डी क्रमांक मिळवावा लागणार आहे, यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सन 2024-25 ची प्रशासकीय मान्यताप्राप्त मात्र अद्याप सुरू न झालेल्या कामांच्या निविदा त्वरित प्रसिध्द करुन 15 ऑगस्ट 2025 पूर्वी कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करावी. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती व जिल्हा नियोजन कार्यालयाच्या समन्वयाने दि. 25 ऑगस्ट 2025 पूर्वी प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत. सर्व राज्यस्तरीय यंत्रणांनी विनियोग दाखले वेळेत सादर करावेत. आपल्या दायित्वाचे अचूक निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव, काम पूर्णत्व व गुणवत्तापूर्ण झाल्याच्या दाखल्यासह दि. 25 ऑगस्ट 2025 पूर्वी सादर करावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) निधीतील यंत्रणांचा योजनानिहाय कामांचा आढावा घेतला. यामध्ये पोलीस विभागासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषि, जलसंपदा, मेढा, महावितरण, क्रीडा, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था, वन, पुरातत्त्व, पर्यटन आदि राज्यस्तरीय यंत्रणांचा सन 2023-24 व 2024-25 मधील मंजूर कामे, प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी, कार्यारंभ दिलेली कामे, पूर्ण झालेली कामे, त्यांची आर्थिक व भौतिक प्रगती यांचा तपशीलवार आढावा घेतला.
00000