ग्रामस्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लोकाभिमुख प्रशासनासाठी भूमिका महत्वाची  – मंत्री छगन भुजबळ

कुसूर, धामोडे, नगरसूल येथे तलाठी कार्यालयांचे उद्घाटन व लोकार्पण

नाशिक, दि. ७ : ग्रामस्तरावर तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या अडचणी  ग्रामस्तरावर प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनासाठी लोकसेवकाची भूमिका निभवावी, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.

कुसूर, धामोडे येथील तलाठी कार्यालयाचे व नगरसूल ता. येवला येथील तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयाच्या उदघाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते.  यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, धामोडेचे  मंडलाधिकारी गणेश गाडेकर, गट विकास अधिकारी नम्रता जगताप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुमेरसिंग पाकळ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, ग्रामस्तरावरील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवकांची भूमिका ही लोकसेवकाची आहे.  अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या अडी- अडचणी सोडवून, प्रशासन अधिक गतिमान करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे सुसज्ज बांधकाम झाल्यामुळे दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल. यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतीने होईल. तसेच यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज मिळण्यास मदत झाली आहे.  तसेच मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्यासाठी २६३ कोटी रुपये खर्च करून कालव्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अधिकच्या पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल. यामाध्यमातून १० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी या कालव्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पोहचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघातील पाणी प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुरेखा गायकवाड, कांताबाई भड, अनिता पैठणकर, उपसरपंच मंगल कमोदकर, लता गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३३ लाख रुपयांचा खर्च

कुसूर, धामोडे तलाठी कार्यालयासाठी प्रत्येकी ३३ लाख रुपये, तर नगरसूल मंडलाधिकारी कार्यालयासाठी ३७ लाख रुपयांचा खर्च आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००