उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा

बीड, दिनांक ७ (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील मुख्य इमारतींचे  इलेव्हेशन प्लॅन, श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखडा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय आराखडा, ग्रंथालय इमारत, सहकार संकुल आदी विविध विकास कामांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, धनंजय मुंडे, नमिता मुदंडा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थिती होते.

बीड जिल्ह्याकरीता महसुल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय इमारती उभारण्यात येत आहे. या सर्व इमारती एकाच परिसरात एकसमान उभारण्यात याव्यात. तसेच जिल्ह्याकरीता उभारण्यात येणारे जिल्हा ग्रंथालय, सहकार भवन या इमारती सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेल्या उभारण्यात याव्यात. संबंधीत विभागानी या इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा. या सर्व प्रशासकीय इमारती उभारण्याचे काम अतिशय गतीने आणि दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक इमारतीमध्ये सुर्यप्रकाश, व्हेंटीलेशन आणि सोलर सिस्टीमचा समावेश करावा.

तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, सुमारे 50 वर्ष जूने असुन, ज्या इमारती कालबाह्य झाल्या आहेत, त्या इमारती धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या धर्तीवर उभारण्यासाठीचा विकास आराखडा तयार करावा. तसेच या रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांच्या सुविधा येथे उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करुन पाठवावा. तसेच याठिकाणी काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांची निवासस्थाने सुसज्ज व सर्व सुविधा असतील याची काळजी घ्यावी. रुग्णालयाच्या विकासासाठी नियमानुसार जे काही लागणार आहे, त्याचा प्लॅन तयार करुन सादर करावा.त्यास मान्यता आणि निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून परळी वैजनाथ येथे रु.286.68 कोटींचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित प्रशासकिय मान्यता देण्यात आली  होती. या प्रकल्पात काही बदल सुचवून रु.351.00 कोटी रक्कमेच्या सुधारित आराखड्यास जिल्हास्तरीय समितीमध्ये मान्यता देण्यात आली. आता हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरच मान्यता प्राप्त करुन घेण्यात येईल. परंतू श्री क्षेत्र परळी वैजनाथ मंदिरास त्याचे पूरातन मुळ स्वरुप प्राप्त करण्यासाठीचा तसेच मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करावा. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतीची संबंधीत अधिकारी आणि

वास्तूरचनाकार यांच्याकडून सविस्तर आढावा घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या.

बीड – अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून बीड-मुंबई रेल्वे सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.  तसेच अंबेजागाई येथील लमान तांडा येथे नवीन कारागृहासाठी लागणाऱ्या जागेसाठी पाठपूरावा करुन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच कंकालेश्वर देवस्थानाची असलेली 12 एकर जागेस संरक्षण भिंत उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करुन सादर करावा असे निर्देश दिले.

महसूल भवनाचे भूमिपूजन

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसुल भवनाचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज भूमिपूजन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगतीपथावर असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाची देखील पाहणी करत संबंधीतांकडून महसूल भवन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती घेवून संबंधीतांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच इमारतीचे काम दर्जेदार करण्याच्या सूचनाही संबंधीतांना त्यांनी दिल्या.

यावेळी सर्वश्री विक्रम काळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थिती होते.

००००