सातारा दि.७ : पर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. याचा अनुभव घेऊन महाबळेश्वर, पाचगणीच्याच धर्तीवर लवकरच मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
महाबळेश्वर व पाचगणी येथे माहे मे-मध्ये सुरु करण्यात आलेल्या पर्यटक सुरक्षा दलाच्या कामगिरीचा आढावा पर्यटन तथा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक श्री. भालचीम आदी उपस्थित होते.
महाबळेश्वर, पाचगणी येथे स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलातील सुरक्षा जवानांची गततीन महिन्यातील कामगिरी अत्यंत समाधानकारक असून यातील जवानांचा उपयोग पर्यटन संस्थांच्या ठिकाणी गर्दीच्या वेळीचे नियोजन नेटके करणे, पर्यटकांची सुरक्षा अबाधित ठेवणे, वाहतूक सुरळीत करणे, प्रसंगपरत्वे पर्यटकांमध्ये होणारी वादावादी सोडविणे, रॅश ड्रायव्हींगला आळा घालणे आदी सर्व कामांसाठी अत्यंत चांगला झालेला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हा अनुभव लक्षात घेता मुंबई येथील हॉटेल ट्रायडंट-मलबार हिल या रस्त्यावरील वीव्हींग गॅलरी, गेट ऑफ इंडिया या मुंबईतील गर्दीच्या पर्यटन स्थळी देखील पर्यटन सुरक्षा दलाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे.
पर्यटन सुरक्षा दल ही संकल्पना राज्यात पहिल्यादांच महाबळेश्वर व पाचगणीमध्ये राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत नेमण्यात आलेल्या जवानांनी अत्यंत चांगले काम केले आहे, असे सांगून या जवानांचे पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी अभिनंदनही केले. याच धर्तीवर मुंबईमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन दलातील जवानांना चार चाकी व दुचाकी वाहने पुरिवण्यासाठी पर्यटन महामंडळ त्यांची खरेदी करणार आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे काम करणाऱ्या दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी, कर्मचारी आहेत. मुंबई येथे या दलामध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक कल्याण मंडळातील अधिकारी, कर्मचारी घेण्यात येतील. अशा पद्धतीने पर्यटन विभाग राज्यात पहिल्यांदा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दल निर्माण करत आहे.
सध्या महाबळेश्वर व पाचगणीत कार्यरत असणाऱ्या पर्यटन सुरक्षा दलातील जवानांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. या जवानांना कायद्याचेही ज्ञान देण्यात येणार आहे, असेही पर्यटन मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
0000