पालकमंत्री संजय राठोड यांनी रामकथा आयोजन व्यवस्थेचा आढावा घेतला

६ ते १४ सप्टेंबरला मोरारी बापू यांची रामकथा

यवतमाळ, दि.८ (जिमाका) : यवतमाळ शहरानजीक लोहारा येथे चिंतामणी कृषी बाजार समितीच्या प्रांगणात दि.६ ते १४ सप्टेंबर दरम्यान सुप्रसिद्ध रामकथा वाचक राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामकथेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याचे त्या ठिकाणी करावयाच्या आवश्यक सुविधेचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला.

यावेळी आ.बाळासाहेब मांगूळकर, माजी आमदार किर्ती गांधी, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, किशोर दर्डा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

रामकथेसाठी यवतमाळ शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरुन देखील मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याचे कथेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे किर्ती गांधी यांनी सुरुवातीस पालकमंत्र्यांना सांगितले. कथेच्या ठिकाणाच्या मार्गावरील झुडपे काढून टाकावी. कार्यक्रमस्थळी स्वच्छतागृहे, अग्निशमन यंत्रणा, पार्किंग, दैनंदिन स्वच्छता केली जाईल, याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी होणार असल्याने पुरेसा पोलिस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेत बदल, बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, रामकथेसाठी संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांना येता यावे यासाठी बसेसचे नियोजन, यवतमाळ शहरातील भाविकांसाठी कथेच्या वेळेप्रमाणे बसेसची व्यवस्था करण्याची सूचना केली. कथास्थळी नागरिकांना पायदळ व्यवस्थितपणे जाता यावे यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगळा ट्रॅक करण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देतांनाच आयोजन समितीस प्रशासन पुर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

000