ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे

सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ३०० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. गोरे म्हणाले, ” ग्रामीण महिलांना स्वयंपूर्ण बनविण्याचे राष्ट्रीय धोरण महाराष्ट्र उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवित आहे. ग्रामीण महिलांना अभियानाचे अनुदान असो किंवा बँकेचे कर्ज असो विहित वेळेत उपलब्ध होण्यासाठी मी स्वतः सर्व भगिनींच्या पाठीशी आहे. लाखो महिलांची दर्जेदार उत्पादने उभी राहत आहेत, त्या सर्व उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून आमचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हास्तरावर उमेद च्या महिलांच्या उत्पादनांची विक्रीसाठी हक्काचे ठिकाण उभे रहावे म्हणून मॉल उभे करण्यात येणार आहेत. इ कॉमर्स प्लॅटफॉर्म उभे करण्यात येणार आहेत. नामांकित प्लॅटफॉर्म सोबत समन्वय केला जात आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या बचतगटाच्या भगिनी आता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करून व्यावसायिक होत आहेत. अभियानाच्या मागील काळात आत्तापर्यंत २५०० कोटी रुपये समुदाय निधी वितरित झाला आहे मात्र या आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिकमध्ये ३०० कोटी रुपयापेक्षा जास्त निधी वाटप झाले आहे, याच पद्धतीने येणाऱ्या काळात महिलांना कालबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी वितरित होईल याची हमी देतो, असे प्रतिपादन केले “.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यातील बचत गट प्रतिनिधींच्या प्रभागसंघांना ३०० कोटी रुपयांचा समुदाय निधी वितरणाच्या सोहळ्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम हे ऑनलाइन पद्धतीने रत्नागिरी जीलह्यातून सहभागी झाले होते. श्री. कदम यांचे हस्ते सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात प्रभागसंघांना धनादेश वितरित करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील निवडक प्रभाग संघांना श्री गोरे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. याच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्येही धनादेश वितरित करण्यात आले.

मान तालुक्यातील उमेदच्या भगिनींनी यावेळी मंत्री श्री. गोरे आणि सर्व अधिकारी यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

या विशेष कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीलेश सागर यांनी केले तर सर्वांचे आभार अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी श्री. निखिलकुमार ओसवाल यांनी व्यक्त केले. यावेळी सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक श्री विश्वास सिद, अभियानाचे अवर सचिव श्री. धनवंत माळी, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. अंकुश मोटे, राज्य कक्षातील आणि जिल्हा कक्षातील अधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

0000000