क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 10 : बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळायला सुरुवात झाली आहे. मातीवरील कुस्तीला महत्त्व असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला महत्त्व आहे. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पुरेपूर निधी घेऊन सक्षम करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

विभागीय क्रीडा संकुलात आज कुस्ती मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, राजेश वानखेडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, अमरावतीला पुण्याशी जोडण्यासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आहे. हा विकसित भारताला संकल्प राहणार आहे. येत्या काळात विमानानेही पुण्याला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. आज शेकडो खेळाडू पुण्याशी जोडल्या गेले आहे. त्यामुळे या दोन शहरादरम्यान वाहतुकीची गतिमान सुविधा होणे गरजेचे आहे. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडवत असून क्रीडाक्षेत्रही मागे राहिले नाही. त्यामुळे दर्जेदार क्रीडा सोयीसुविधा उपलब्ध करून अमरावतीला क्रीडा क्षेत्रात न्यायचे पुढे आहे.

जागतिक बुद्धिबळमध्ये 19 वर्षीय दिव्या देशमुख यांनी इतिहास घडवला आहे. ती भारताची 88 ग्रॅण्डमास्टर ठरली आहे. अशा प्रकारचा इतिहास अमरावतीमध्ये घडवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र केसरीमुळे कुस्तीला महत्त्व आले असून ऑलम्पिक स्पर्धांमध्येही हा खेळ गेला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कुस्तीगीर घडत आहे. विभागीय क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधी देण्यात येईल. तसेच येत्या काळात व्यायाम शाळेसाठी 15 लाख, व्यायाम शाळा बांधकामासाठी 15 लाख आणि क्रीडांगण दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच इको टुरिझममधून एका ठिकाणच्या कामासाठी 30 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे कोलकाससह चार कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ क्रीडापटूंच्या सत्कार करण्यात आला. तसेच खेळाडूंना क्रीडा साहित्याची वाटप करण्यात आले. कुस्तीगीर परिषदेतर्फे पालकमंत्री यांना चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारीग णेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 94 लाख रुपये किमतीचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.

00000