मुंबई, दि. १३ : मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना लागू करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व भटक्या जाती -क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यास पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लढा घेण्यासाठी पात्र लाभार्थीनी सन २०२५ – २६ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी मुंबई शहरसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मुंबई शहर/मुंबई उपनगर, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई – ७१ येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.
०००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/