महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नऊ महिला सरपंचांचा समावेश

नवी दिल्ली, १३ : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १५ सरपंचांचा समावेश असून यात नऊ महिला सरपंच असून केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे.

सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.

महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच खालीलप्रमाणे आहेत: श्री. प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), श्रीमती जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, ता. कामठी, जि. नागपूर), श्री. संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे), श्रीमती डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, ता. अकोला, जि. अकोला), श्रीमती नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे), श्रीमती सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम), श्रीमती अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली), श्रीमती संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), श्री. चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया), श्रीमती रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा), श्री. सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी), श्रीमती पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी), श्री. प्रमोद किसन जगदाळे (बिदल, ता. मान, जि. सातारा), श्री. शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती), श्रीमती  प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर) असे एकूण 15 सरपंच आहेत.

गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी  या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार होणार असून, यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. “आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळख” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) आधारित ‘सभा सार’ अ‍ॅप लाँच होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 16 वा अंक प्रकाशित केला जाणार आहे.

0000