मुंबई दि. १३ : रायगड येथील रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, माणगांव, तळा येथील नागरिकांच्या सुविधेसाठी बसस्थानाकाच्या नुतनीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
श्रीवर्धन येथील रोहा, तळा, माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा येथील एस.टी.डेपोच्या दुरूस्तीच्या कामासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे, मुंबई सेंट्रलचे व्यवस्थापकीय संचालक, विभागीय नियंत्रक आणि डेपो मॅनेजर उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, तळा येथील वाहनतळ समतल करण्याचे काम पूर्ण झाले असून, कुपणभिंत, प्रसाधनगृह व त्यावर चालक/मालकाचे विश्रांतीगृहाचे नुतनीकरण कामकाजासाठी अंदाजपत्रक सादर करावे. तसेच रोहा येथील कामकाजासाठी रस्त्यांची डागडुजी आणि निवासस्थानाच्या कामकाजासाठी वेगळे अंदाजपत्रक तयार करावे. माणगाव बसस्थानकात बैठक व्यवस्थेचे काम पूर्ण असून, उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. तसेच, म्हसळा येथील काम जलद गतीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/