विकसित भारताचे स्वप्न, विकसित महाराष्ट्राची साथ गेल्या दशकात देशासह महाराष्ट्राचा वेगवान विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. ११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी सौ. अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध देशांचे वाणिज्यदूत आणि अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवत भारताला केवळ प्रगत राष्ट्र बनवण्याचे नव्हे, तर संपूर्ण जगाच्या विकासाचे इंजिन बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे. नव्या रस्त्यांचे जाळे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, बुलेट ट्रेन प्रकल्प, वाय-फाय सिटीज आणि स्मार्ट सिटी योजनेतून शहरांचे रूपांतर घडवले जात आहे. या कालखंडात तब्बल २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले असून, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. रोजगारनिर्मिती, डिजिटल सेवांचा विस्तार आणि कृषी, उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुधारणांनी सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशाच्या एकूण प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन आहे आणि गेल्या दशकात या राज्यानेही विकासाच्या दिशेने भरारी घेतली आहे. परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, ४०% पेक्षा जास्त एफडीआय महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई ही देशाची स्टार्टअप राजधानी बनली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांमध्येही स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारी पर्यावरणनिर्मिती करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्र, कृषी प्रक्रिया उद्योग, आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल म्हणाले की, भारताने जागतिक स्तरावर आपल्या संबंधांना आणखी बळकट केले आहे. विविध देशांसोबत द्विपक्षीय करार, संरक्षण, व्यापार, आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढले आहे. यामुळे भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर अधिक महत्त्वाची झाली आहे.

आजचा दिवस “विकसित भारत” या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. त्याचबरोबर “विकसित महाराष्ट्र” हे देखील त्याचे अभिन्न अंग आहे. या दोन्ही ध्येयांच्या पूर्ततेसाठी सर्वच देशांच्या प्रतिनिधींची सोबत महत्त्वाची आहे.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/