साखरमाची या गावातील कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी महसूल विभागाने प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन व दरड कोसळून नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील ‘साखरमाची’ या गावाचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करण्यासाठी महसूल व वन विभागाने जागेची आवश्यकता लक्षात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील साखरमाची गावाच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील ‘साखरमाची’ गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने  प्रस्ताव तयार करावा. गावातील लोकांकडे उपलब्ध असलेल्या जागेची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. पुनर्वसन करण्यासाठी जी जमीन उपलब्ध आहे त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या विविध  परवानग्या घेवून तत्काळ कार्यवाही करावी. या गावामध्ये ४६ कुटूंब बाधीत होणार आहेत हे लक्षात घेऊन संपूर्ण कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव  महसूल आणि वन विभागाने संयुक्त परीक्षण करून तयार करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीव्दारे पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, नागपूरच्या प्रधान मुख्य वनसरंक्षक शोमीता बिश्वास, पुणेचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ठाणेचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ, पुणे जिल्हा परिषदेचे सभापती सुभाष मोरमारे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

******

संध्या गरवारे/विसंअ/