कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 13 :- कोकण व गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  आढावा घेऊन या नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा विभागाचे सह सचिव तथा मुख्य अभियंता प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची प्रगती व तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेत जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले,

या प्रकल्पाद्वारे कोकणातील जलस्रोतांचा नियोजनबद्ध वापर करून गोदावरी खोऱ्यातील पाणी टंचाई भागांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण काम गतीने करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वापरण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले, मराठवाड्याच्या दुष्काळी भागाच्या कृषी व औद्योगिक विकासासाठी हा  प्रकल्प महत्त्वाचा असल्याने दिलेल्या वेळेतच या प्रकल्पाच्या सर्वेक्षण काम व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी याचा नियमित आढावा घ्यावा,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/