ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. १३ :-  ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ मधील अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर करून प्रस्तावित १३ गावांच्या योजनेचे संकल्पन तातडीने पूर्ण करावे. तदनंतर या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी दिली जाईल असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर)  या बंद असलेल्या योजनेच्या शिल्लक असलेल्या पाण्यातून शेवगाव पाथर्डी मतदार संघातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावांचा समावेश करून योजना पुनश्च सुरू करणे संदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार श्रीमती मोनिका राजळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.

ताजनापूर टप्पा-१ चालू करुन त्यामध्ये अतिरिक्त १३ गावांचा समावेश करणेबाबतच्या प्रस्तावास शासनाची तत्वतः मान्यता प्राप्त  आहे. या योजनेद्वारे शेवगाव तालुक्यातील १३ गावातील  साठवण तलाव व बंधारे गुरूत्वीय पाईप वितरण प्रणालीव्दारे भरून देणे नियोजित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा-२ मधील कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला.

 दौंड, फुलंब्री, खेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचा आढावा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे दौंड, फुलंब्री, खेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचाही आढावा घेतला. या यावेळी आमदार राहुल कुल, आमदार श्रीमती अनुराधा चव्हाण, आमदार बाबाजी काळे उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे महत्वाचे असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, सिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत व दर्जेदार झाली पाहजेत. निकृष्ट काम करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही.

कालवा वितरण व्यवस्था, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतरण या  विषयी बैठकीत चर्चा करण्यात येऊन या कामांबाबत जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/