अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नियुक्त देण्यात आली आहे. हा एक गौरवाचा क्षण असून यानिमित्ताने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माला आणि शंकरबाबा यांचे अभिनंदन केले आहे.
जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत एक बाळ रडत होते. कुणाचे तरी नकोसे झालेले एक छोटेसे जिवंत अस्तित्व, डोळ्यात प्रकाश नव्हता, शरीर अत्यंत जराकर, पण त्या क्षणी सुरु झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा. माला शंकरबाबा पापळकर यांची. त्या अंधारात जन्मलेली माला नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक या पदावर रुजू होणार आहे. एका बेवारस दृष्टिहीन मुलीचे हे यश केवळ तिची जिद्द, परिश्रम आणि माणुसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळे पूर्ण होऊ शकले.
मालाला अमरावतीच्या वझ्झर येथील दिव्यांग बालगृहात आणण्यात आले. जिथे तिच्या जीवनात प्रकाश झाला तो म्हणजे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे. त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. तिचे नाव ‘माला’ ठेवले आणि तिला केवळ आश्रयच नाही, तर ‘ओळख’ दिली. शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड आणि शंकरबाबांचा आधार यामुळे माला शिकत गेली. ब्रेल लिपीतून दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करण्यात आले.
जगण्यातली प्रत्येक पायरी मालासाठी परीक्षा होती. ना जन्मदाते होते, ना डोळ्यांचा प्रकाश पण, अंगात होती ती अपराजेय इच्छाशक्ती. अपंगत्वाच्या मर्यादा इगारून तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१९ पासून तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. २०२३ मध्ये तिने एमपीएससी ‘ग्रुप सी’ मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली, तेव्हापासून ती नियुक्तीच्या प्रतिक्षेत होती. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून तिची नियुक्ती होणार आहे. तिच्यासोबतच एकूण ५४ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. सोमवारी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यावेळी स्वतः शंकरबाबा पापाळकर सुद्धा तिच्यासोबत होते. येत्या काही दिवसांत मालाला नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.
पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी, जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे ती सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना आहे. आवश्यक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविले. त्यानुसार पुर्तता केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संवाद साधला. मालाचे कौतुक केले. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मालाला नियुक्तीपत्र दिले जाईल, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यानी बोलून दाखवल्याचे पापळकर यांनी सांगितले.
00000