‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता अर्ज प्रक्रिया सुरु असून  www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर २० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले आहे.

ही योजना इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. शासनाच्या समान धोरणांतर्गत ‘महाज्योती’ मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजसेवा  तसेच संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ अशा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाबाबतची सर्व माहिती, पात्रता निकष, अटी-शर्ती आणि अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना अनिवासी व ऑफलाईन माध्यमांतून प्रशिक्षण घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑफलाइन प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन तर प्रशिक्षणाच्या प्रारंभी एकरकमी आकस्मिक निधी मिळणार आहे. प्रशिक्षण नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार असून प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्री. वावगे यांनी कळविले आहे.

अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण: महाज्योतीने सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ हाती घेतली असून  स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षण योजनेद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणासह विद्यावेतनाचे आर्थिक पाठबळ दिले जात आहे.  या उपक्रमामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. परिणामी, बहुजन प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक व दीर्घकालीन परिवर्तन घडत आहे. ही योजना फक्त प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रगतीचा पाया आहे. यातून त्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर आत्मविश्वास आणि संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत नोंदणी करावी.

0000