छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहास आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आदिवासी भिल समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन आज संत एकनाथ रंगमंदिर येथे करण्यात आले होते. मेळाव्यास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे, प्रदेश सचिव मधुकर पवार, प्रदेश संघटक सचिन कुमार बर्डे, प्रदेश संपर्क प्रमुख सुनिल गांगुर्डे, मराठवाडा युवा अध्यक्ष सुनिल ठाकरे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ उईके म्हणाले, आदिवासी बांधवांच्या गावपाड्यांमध्ये रस्ते, वीज, शाळा, पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण यासह आवश्यक त्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आदिवासी विकास विभाग तत्पर आहे. आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ती संपूर्ण मदत केली जाणार आहे. महिलांनी स्वयंसहायता बचतगट तयार करावेत. या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. गावपातळीवरील शेवटचा नागरिक केंद्रस्थानी ठेऊन सरकारचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावपाड्यावरील समाजबांधवांचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे. घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन एकही कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. समाजाच्या सर्वांगिण विकासासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
उर्जा मंत्री श्री. अतुल सावे यांनी समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार संजना जाधव यांचेही भाषण केले.
संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी आदिवासी समाजाच्या अडचणी मांडल्या.
प्रस्ताविक सचिन बर्डे यांनी केले. तर आभार भरत बर्डे यांनी मानले.
यावेळी समाजबांधव उपस्थित होते.