श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, दि.१४ (जिमाका) – शहरात करावयाच्या विकास कामांचे आधी नियोजन करा. हे नियोजन परिपूर्ण झाल्यानंतर निधीची मागणी करा. नंतर दर्जेदार कामे करा व जनतेला उत्तम सुविधा, त्यासाठी शासन आपल्या नेहमी सोबत आहे, असे आश्वासन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरकरांना दिले.
येथील श्री गणेश महासंघ उत्सव समिती २०२५-२६ च्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलजवळ हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट, विधानपरिषद सदस्य आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार संजय केणेकर, गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्विराज पवार, विद्यमान अध्यक्ष अनिकेत निल्लावार, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या संबोधनात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, जनतेची कामे ही दर्जेदार व्हायला हवीत. निधी योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करावयाच्या कामांचे नियोजन आधी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून करा. त्यानंतर प्रस्ताव द्या. योग्य कामाला निधीची कमतरता पडू देणार नाही. शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बाधित झालेल्यांनाही पर्यायी सुविधा उपलब्ध करुन द्या. छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच २०० कोटी रुपये खर्चून उद्योगासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर तयार करण्याची योजना आहे, असेही त्यांनी सांगितले. खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
गणेश महासंघाच्या उपक्रमात वृक्ष लागवड उपक्रमाचे स्वागत करुन प्रत्येक सदस्याने एक झाड लावावे, असे आवाहन त्यांनी केले. नशामुक्त अभियान राबवुन युवकांना योग्य दिशा देण्याच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.
०००००