मुला-मुलीत भेद करण्याची मानसिकता बदला – पालकमंत्री संजय शिरसाट

कन्या सन्मान दिवस

छत्रपती संभाजीनगर, दि.१४ (जिमाका) – जन्म देणारी आई, आयुष्यभर साथ देणारी पत्नी, जिव्हाळा लावणारी बहिण हवी असतांना मुलीचा जन्म नको, ही मुला-मुलीत भेद करणारी मानसिकता बदला, असे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पंढरपूर येथे केले.

कन्या जन्माचे स्वागत करुन मुलींचा जन्मदर वृद्धिंगत करण्यास चालना देण्यासाठी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘कन्या सन्मान दिवस’ सर्व मंडळ मुख्यालयात साजरा करण्यात आला. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट हे उपस्थित होते.

पंढरपूर सरपंच श्रीमती वैशाली राऊत, वळद सरपंच अमर राजपूत, वडगाव सरपंच सुनिल काळे, पाटोदा सरपंच कपिंद्र पेरे, तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसिलदार शिवानंद बिडवे, अपर तहसिलदार डॉ. परेश चौधरी, गटविकास अधिकारी मीना रावताळे, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, ॲड. ललित शिरसाट, डॉ. श्रद्धा स्वामी, विकास जैन आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. वळद गावात मुलीच्या जन्मानंतर २१०० रुपये मातेस देण्याची योजना राबविली जाते. त्याअंतर्गत मातांना २१०० रुपयांचा धनादेश पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. ॲड. शिरसाट यांनी प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच डॉ. स्वामी यांनी महिलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली. आशासेविका पूजा साळवे यांनी तसेच विद्यार्थिनी पूजा पवार यांनी अपले मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, मुलगा मुलगी समानता ही फक्त बोलण्याची गोष्ट नसून ती कृतीत आणणे आवश्यक आहे. समाजात मुलगा मुलगी भेद करण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आई, बहिण, पत्नी आवश्यक असते. मग मुलगी का नको? मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रात सरस आहेत. मुलींनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करा.तिचे लाड करा. मुलापेक्षा मुलगी हीच म्हातारपणाचा आधार ठरते, हे मी अनेक ठिकाणी पाहतो. मुलगाच हवा हा दुराग्रह नको. त्यासाठी मनातून हा भेद मिटवा,असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक डॉ. व्यंकट राठोड यांनी केले तर शिवानंद बिडवे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले.

०००००